भारतीय संस्कृतीने स्त्रीला जीवनव्यापी गौणत्व बहाल केले , त्याची मुळे आपल्या परंपरेत रुजलेली आहेत .काही मुली आज उंच भरारी मारून खास पुरुषी असलेली क्षेत्रे काबीज करून समानता सिद्ध करत आहेत पण अश्या मुली बोटावर मोजता येतील इतक्याच !एरवी , स्त्री भृणहत्या , बलात्कार ,अत्याचार या सारखे स्त्रियांवरचे अत्याचार वाढतच आहेत .आणि "लडकी बचाव " चा नारा द्यावा लागत आहे .साधारण स्त्रीला अजूनही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही ."धर्म " या संकल्पनेने व त्याच्याशी निगडीत रूढी , परंपरेने स्त्रीला अपार दु:ख दिले .इंग्रजाच्या आगमनानंतर काही तरुणांना स्त्रियांच्या गुलामगिरीची जाणीव झाली व त्यांनी सुधारणा घडवून आणल्यात . पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या काळात गार्गी , मैत्रेयी , राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई या सारख्या तेजस्वी स्त्रियांची उदाहरणे होती पण स्त्रिया अन्याया विरुध्द पेटून उठल्या नाहीत .त्याग , सहनशीलता याचे महत्व व समाजाचे दडपण हे त्याचे कारण .बंड करण्या पेक्षा सती जाऊन गौरवान्वित होणे व आत्महत्या करणे त्या पसंत करीत .शिवाय बळी जाणाऱ्यांची मानसिकता ,नेहमीच इतरांनी आपल्याला मदत करावी ,यातून सुटका करावी अशी असते .व्रत वैकल्ये ,उपासतापास करून आपल्या पदरात हव ते दान पडेल असा त्यांचा विश्वास. भारतीय संस्कृतीने स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य नाकारले अनेक वर्षे स्त्रियांनी ते स्वीकारले .
२०व्या शतकाच्या उत्तरार्धात व २१ व्या शतकाच्या पूर्वार्धात स्त्रियांनी लिहिलेली आत्मचरित्रे वाचली
असताना जाणवते कि हे गौणत्व त्यांच्या रक्तात भिनलेले आहे त्याचा घट्ट असा पीळ त्यांच्या मनात तयार झालेला आहे तो सैल करावासा वाटतो पण करता येत नाही .सरत्या आयुष्यात , ते जगायचेच राहून गेले हि बोचरी खंत मात्र उरते .नवऱ्याला मोठ व्हायला त्यांनी मदत केली , प्रोत्साहन दिले, त्याची मर्जी सांभाळली . हे सारे त्यांनी मर्जीने , करावस वाटले म्हणून केले पण आयुष्याच्या उत्तरायणात आपला भूतकाळ पुन्हा एकदा वर्तमानात आठवत असताना तो शब्दात मांडत असताना त्यांची खंत मात्र डोकावते---कदाचित त्यांच्याही नकळत .स्मृतिचित्रे हे लक्ष्मी बाई टिळकांचे मराठीतील सर्वोत्कृष्ट असे आत्मचरित्र .१९३४ ते १९३७ या कालखंडात प्रसिध्द झाले .त्यात त्या लिहितात " टिळक पेटीत गेले व माझे अस्तित्व जागे झाले "टिळकांचा मृत्यू १९१९ सालचा . त्यानंतर त्यांनी सर्व आठवणी , अनुभव लिहून काढले .ते हे वाक्य हृदय पिळवटून टाकणारे तर आहेच त्याबरोबर स्त्रियांची होणारी गळचेपी विशद करणारे आहे .
आजही बाईची माणूस म्हणून जगण्याची धडपड सुरूच आहे ." मी माणूस, माणूस आधी , नाही नुसती नार" हा तिचा आक्रोश आहे . पण आता कोणाच्या मदतीची अपेक्षा न करता स्वत: च स्वत:च उध्दार केला पाहिजे . उदध्वस्त होऊन मन मारून जगण्यापेक्षा स्वत:ची प्रगती करीत आनंदाने जगले पाहिजे आपण जाळून इतरांना सुवास देणाऱ्या उदबत्तीची उपमा आता जुनी झाली . त्यापेक्षा फुलाप्रमाणे स्वत: विकसित होत इतरानाही आनंदित करत का नाही जगायचे ?त्या करिता आक्रमक नव्हे तर आपल्या रास्त इच्छा , मते व आवडीच्या बाबतीत आग्रही का नाही राहायचे ?आपल्या भावनाची जोपासना करणे हि प्रत्येकाचीच गरज आहे त्या मारून टाकायला नकोत .आयुष्य समृध्द व्हायला त्यामुळे मदत होते .आपले हित जपणे व आवडींचा विचार करणे म्हणजे स्वार्थ वा अप्पलपोटेपणा नाही .फक्त हे करीत असताना इतरांवर अन्याय व्हायला नको .आपला आनंद इतरांच्या दु:खाचे कारण व्हायला नको .स्वहित जपावे पण परहित जाणावे .सतत भीती , अपमान , नकार , दडपण यांना सामोरे जाव लागत असेल तर उदासीनता , दु:ख , राग , मत्सर या सारख्या रोगट व नकारात्मक भावनांना व्यक्ती बळी पडते ,मग घराचे रणांगण होते नाहीतर घरे मुकी होतात . दोन्ही परिणाम घराचे व त्यातील व्यक्तींचे स्वास्थ्य बिघडवतात .सुखी व समृध्द जीवना करिता भावनाची जोपासना व मशागत महत्वाची आहे समतेचा व मानवतेचा पुरस्कार करण्याचे काम शेवटी कुटुंबाचेच आहे त्याकरिता सुजाण व डोळस पालकत्वाची चळवळ ---पण ती फक्त आईवडिलापुरतीच मर्यदित न राहता --मुलामुलींच्या संस्कारक्षम वयाला आकार देणाऱ्या समाजाच्या प्रत्येक घटकाकरिता असायला हवी .
आपले सुख व समाधान हे पराश्रयी असूच शकत नाही .ते बाजारातही मिळत नाही . आपल्या सुखाच्या जागा आपल्याला प्रयत्नपूर्वक शोधाव्या , नव्हे त्या निर्माण कराव्या लागतात
कवी बोरकर म्हणतात "देखणी जी जीवने| जी तृप्तीची तीर्थोदके |
चांदणे ज्यातून वाहे | शुभ्र पाऱ्यासारखे |
इंग्रजी भाषांतर मला सापडले
Life is beauteous,
Which is pilgrimage of contentment
From which flows the moon beam
Like pure mercury .
No comments:
Post a Comment